अरुण भोई
पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. भविष्य निर्वाह निधी मागणी अर्ज गहाळ होत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भविष्य निर्वाह निधीच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात व अर्थ विभागात समन्वय असणे आवश्यक आहे. या दोन्ही विभागात कार्यक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. शिक्षकांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.
यावेळी पुणे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिनगारे व मुळशी तालुका अध्यक्ष दशरथ गावडे, सुरज कांबळे, पांडुरंग शिंदे, सुहास मोरे, राहुल गायकवाड, विनोदकुमार भिसे, गोविंद जाधव, सत्यदेव खाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.