पुणे : पुण्यात एका पत्रकाराने पान टपरी चालकाला ‘तु गुटखा विकतोस, आता मला दोन लाख रुपये दे’, असे म्हणत बळजबरीने पान टपरी चालकाच्या खिशातील 30 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी गुंजन चौकात भोला पान टपरी येथे घडली आहे.
टपरीचालक सुभाषचंद्र रामअवध मोरया (वय-30, रा. पर्णकुटी चौकी येरवडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्रकार सतीश राठोड (वय-42), आणि पत्रकाराची सहकारी 40 वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टपरीचालक मोरया आणि पत्रकार सतीश राठोड यांची आधीपासूनच ओळख होती. त्यावेळी पत्रकार आणि त्याची सहकारी महिला हे दोघेजण पानटपरीवर आले. आणि तिथे आल्यावर फिर्यादी सुभाष यांचा पुतण्या संतोष आणि मेहुणा शिवप्रसाद यांना मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी सुभाष तिथे पोहचल्यावर ‘तु गुटखा विकतोस, तू मला दोन लाख रुपये आत्ताच्या आता दे, नाहीतर मी पोलीसांकडे जाईल,’ अशी धमकी दिली. तसेच दर महिन्याला दहा हजारांचा हप्ता मागितला. जर हप्ता नाही दिला तर तुझा धंदा बंद करेल, अशी धमकीही दिली.
या प्रकरणी टपरीचालक सुभाषचंद्र मोरयाने केलेल्या तक्रारीवरुन पत्रकार आणि त्याची सहकारी यांच्यावर येरवडा पोलीसांत खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक जयदीप पाटील करीत आहेत.