पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून (Pune Vote Scam) विरोधी पक्षांनी ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून (Pune Election) राज्यातील राजकारण तापवलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर विविध प्रात्यक्षिके दाखवून मतदार चोरी कशी घडते हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. एक नोव्हेंबर रोजी या मुद्द्यावर एकत्र येत विरोधी पक्षांनी मुंबईत मोठा मोर्चा काढला.

दरम्यान, राज्यभर या विषयावर चर्चा सुरू असतानाच पुण्यात ‘व्होट चोरीचा पुणे पॅटर्न’ समोर आल्याचे समजते. या पॅटर्नमध्ये सत्ताधाऱ्यांसोबत काही विरोधी नेत्यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. महापालिकेने प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर प्रत्येक प्रभागातील मतदारयादी अंतिम करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. मात्र, यातील काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतदारयादीत फेरफार केल्याचे आरोप समोर आले आहेत.

या पॅटर्ननुसार, काही राजकीय गटांनी आपल्याविरोधात असलेल्या मतदारांना शेजारच्या प्रभागात हलवून, आपल्यासाठी अनुकूल असलेल्या मतदारांना आपल्या प्रभागात दाखल केल्याचे सांगितले जाते. म्हणजेच, एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात स्थानांतरित करून मतदारसंख्येचा तोल बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत काही ठिकाणी आर्थिक व्यवहारही झाल्याची चर्चा आहे.

या संदर्भात निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, काही इच्छुक उमेदवारांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सीमावर्ती भागातील मतदारांची नावे आपल्या प्रभागात हलवली आहेत. परिणामी काही प्रभागांतील मतदारसंख्या 1.25 ते 1.50 लाखांपर्यंत वाढली असून इतर काही प्रभागांतील मतदारसंख्या 65 हजारांवर आली आहे.
तक्रारींच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाने तत्काळ पावले उचलली आहेत. आयोगाने मतदार याद्यांचे क्रॉस-चेकिंग करण्याचे आदेश दिले असून हे काम सहाय्यक आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासासाठी 28 अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारयादी पदनिर्देशित अधिकारी रवी पवार यांनी या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.







