पुणे, ता. 29 : अंबेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खून व अन्य गंभीर कलमांतील गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश दीपक येनपुरे याला तब्बल सात महिन्यांनंतर अतिरिक्त सत्र न्यायालय, पुणे यांनी जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी 27 ऑगस्ट 2026 रोजी हा आदेश दिला. अशी माहिती ॲड. प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे.

प्रथमेश येनपुरे याच्याविरुद्ध अंबेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 103, 109, 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3), शस्त्र कायद्यातील कलम 4(25), महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम 37(1) (3) सह 135 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

आरोपीच्या वतीने ॲड. प्रकाश चव्हाण यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात प्रथमेश येनपुरे याने केलेला विशिष्ट हल्ला अथवा त्याचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्टपणे नमूद नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच साक्षीदारांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवालातील जखमांच्या वर्णनात तफावत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

केवळ साक्षीदारांनी आरोपीचे नाव घेतले आहे, या आधारावर जामीन नाकारता येणार नाही, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला खटला पूर्ण होईपर्यंत कोठडीत ठेवण्यासाठी पुरेशी कारणे नसल्याचे निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज मंजूर केला.
दरम्यान, 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामीनदारावर येनपुरेची जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आरोपीने साक्षीदारांवर दबाव आणू नये अथवा पुराव्यांमध्ये छेडछाड करू नये, अशी अट न्यायालयाने घातली आहे. या प्रकरणात ॲड. एच. एच. दरेकर यांनी सहकार्य केले.
नेमके प्रकरण काय?
कात्रज परिसरात जुन्या भांडणाच्या कारणातून अभिजित औचरे याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आल्याची तक्रार 29 जुलै 2025 रोजी रात्री पोलिसांकडे करण्यात आली होती. साक्षीदाराच्या जबाबानुसार, सोहम धुमाळ, संकेत रेणुसे आणि अन्य काही जणांनी अभिजितवर हल्ला केला होता. या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत अभिजितला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात प्रथमेश येनपुरे याच्यावरही गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. आता न्यायालयाच्या आदेशामुळे त्याचा जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.







