पुणे : राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी भाविक पंढरपुरात येत असतात. राज्य एसटी महामंडळाने यापूर्वी पाच हजार बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर, महामंडळाच्या पुणे विभागाने जवळपास ३०० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि विभागातील एकूण १४ डेपोंतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे शहर व जिल्ह्यातून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. महामंडळाने आषाढीच्या निमित्ताने पुणे विभागातून २७५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, रायगड, पालघर विभागातून जादा बस मागविण्यात आल्या आहेत. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्याच्या दोन दिवस अगोदर सर्वाधिक बस सोडल्या जाणार आहेत.