पुणे: पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका इस्टेट एजंटचा दोन नराधमांनी खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (9 मे) रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मनोहर दिनकर शिंदे (वय 46 वर्ष, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असे मृत इस्टेट एजंटचे नाव आहे. याप्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय 32 वर्ष) आणि केशव मोतीराम असोरे (वय 26 वर्ष, दोघेही रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेव्हणीचे आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते. रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचे काम करत होता. नंतर त्याने टुरिस्टचा व्यवसाय सुरु केला होता. मनोहर यांचा या दोघांच्याही अनैतिक संबंधांना विरोध असल्याने त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. दरम्यान, शुक्रवारी (9 मे) च्या रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे आपल्या दोन तीन मित्रांना घेऊन मनोहरला गाठले.
त्यानंतर तेथील ज्ञानदा अपार्टमेंटच्या समोर त्याला लाथा-बुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. यात डोक्याला मार लागल्याने मनोहरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच भारती विद्यापीठ पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींच्या मागावर दोन पथके रवाना केली. याप्रकरणातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीड येथील गेवराई येथून अटक केली आहे.
याप्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.