पुणे : फॅन्सी (चॉईस) नंबरमधून पुणे आरटीओला मागील वर्षभरात तब्बल ४७ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २०२३ या वर्षी महसुलात १४ कोंटीची वाढ झाल्याचे आरटीओतील आकडेवारीतून समोर आले आहे.
दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करण्यापूर्वी आपल्या वाहनाचा क्रमांक हटके असावा, अशी अनेक वाहनमालकांची इच्छा असते. यासाठी आरटीओमध्ये गर्दी होते. हौशी वाहनमालक तर वाट्टेल तेवढे पैसे मोजतात, आणि फॅन्सी नंबर मिळवतात. अनेकजण लकी नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख नंबरप्लेटच्या माध्यमातून गाडीला लावण्यासाठी आग्रही असतात. यासाठी परिवहन विभाग पैशांची आकारणी करतो. पसंतीच्या क्रमांकासाठी विशिष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर हा नंबर संबंधित वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो.
एकाच नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेशधारकाला तो नंबर दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव होतो. आरटीओच्या या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये आरटीओ कार्यालयाला एकूण ३३ कोटी ५० लाख ५७ हजार ८५१ रुपये महसूल मिळाला. तर, २०२३ मध्ये यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये परिवहन विभागाला ४७ कोटी १४ लाख ९६ हजार ८०७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामुळे २०२२ च्या तुलनेत १४ कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
एका चारचाकी वाहनधारकाने त्यांच्या कारला १ नंबर असावा, यासाठी तब्बल १२ लाख रुपये मोजल्याची नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. विशेषतः एक ते दहा या क्रमांकासाठी सर्वाधिक पैसे मोजले जातात.
याविषयी माहिती देताना पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, चॉईस नंबरच्या माध्यमातून पुणे आरटीओ कार्यालयाला २०२३ या वर्षभरात एकूण ४७ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. चॉईस नंबरसाठी नागरिकांची चांगली पसंती मिळत आहे.