विशाल शिंदे (नसरापूर) प्रतिनिधी

Pune : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथील चेलाडी चौकात अवैध पार्किंग व बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पुलाखाली मोठ्या प्रमाणात उभ्या राहणाऱ्या अवैध वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
नसरापूर परिसर उताराचा असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत चेलाडी चौकातील धोकादायक वळणावर उभ्या असलेल्या अवैध गाड्यांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी, अनेक अपघात घडले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा परिसर राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असूनही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
विशेष म्हणजे, या भागात वेळोवेळी आरटीओ (Regional Transport Office – प्रादेशिक परिवहन कार्यालय) प्रशासन टोल नाक्याजवळ कार्यरत असते. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक त्यांच्या नजरेतून कशी सुटते, असा सवाल उपस्थित होत आहे. या अवैध धंद्यामागे कुणाचा वरदहस्त आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याशिवाय, केवळ चेलाडी चौकापुरताच हा प्रश्न मर्यादित नसून कापूरहोळ, शिरवळ, सारोळा, खेड शिवापुर या भागांतूनही मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी गाड्या पुण्याकडे धावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे-सातारा महामार्गावरील हा पट्टा बेकायदेशीर वाहतुकीचा हॉटस्पॉट बनत चालल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
या संदर्भात ट्रॅफिक पोलीस हवालदार पडळकर यांनी लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कठोर पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रज्योत कदम यांनी इशारा देत सांगितले की, “अवैध पार्किंग व बेकायदेशीर प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
सदर परिस्थिती लक्षात घेता, राजगड पोलीस स्टेशन, आरटीओ प्रशासन व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे तातडीने कठोर कारवाई करून हा अवैध प्रकार पूर्णपणे बंद करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेणे अत्यावश्यक बनले आहे.







