पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना तासन् तास अडकून पडावे लागले. उन्हाळी सुट्ट्या संपण्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली होती. त्यातच कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला.

एकवीरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांसह मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कामशेत, कार्ला फाटा, मळवली आणि लोणावळा परिसरातील अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले.

वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावल्याने पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनचालकांना इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला.
दर आठवड्याच्या शेवटी अशा प्रकारची वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







