पुणे : मध्य रेल्वेतील पुणे रेल्वे विभाग हा महत्वाचा विभाग आहे. या विभागात आता दौंड, नगरचा भाग देखील आला आहे. त्यामुळे विभागाचा विस्तार थेट बीड जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. मात्र, पुणे रेल्वे विभागात रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) अद्याप ही ९८ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरपीएफकडे मनुष्यबळ कमी असल्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यासाठी ४१ कर्मचारी आरपीएफच्या मदतीसाठी घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे.
पुणे रेल्वे विभागात पुणे रेल्वे स्टेशन हे सर्वात मोठे स्टेशन आहे. या ठिकाणी देखील आरपीएफला कर्मचारी कमी पडत आहेत. तातडीने आरपीएफचे जवान मिळणे शक्य नाही. त्यामुळे पुणे आरपीएफकडून महाराष्ट्र सुरक्षा दलाकडे ४१ जवान देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या जवानांचा उपयोग प्रवासी व्यवस्थापन, गस्त घालणे, पार्किंग व्यवस्थापन अशा कामांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे आरपीएफला मोठा दिलासा मिळणार आहे.