पुणे : येथील कल्याणी नगर भीषण अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील , विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या ब्रह्मा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजी नगरमधून मंगळवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे.
सोमवारी पुण्यातून विशाल अग्रवाल गायब झाले होते. त्यावेळेस ते फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फरार झाल्यामुळे त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. दरम्यान पोलिसांनी त्यांचा माग काढत छत्रपती संभाजीनगर मध्ये रात्री उशिरा कारवाई करीत अगरवाल यांना ताब्यात घेतले. त्यांना घेऊन गुन्हे शाखेची पथके पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.
विशाल अग्रवाल हे छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये अगरवाल थांबले होते. तेथूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
कल्याणी नगर येथे रविवारी आलिशान पोर्श कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्टा या तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये विशाल अगरवाल यांचा सतरा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला मद्यपार्टी करण्यासाठी परवानगी दिल्याप्रकरणी आणि आलिशान पोर्श कार त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना देखील चालवायला दिल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला या प्रकरणांमध्ये 304 (अ) हे कलम लावण्यात आले होते. मात्र, नागरिकांमधून निर्माण झालेला संताप माध्यमांमध्ये उठलेली टिकेची जोड पाहता पोलिसांनी 304 हे कलम आरोपीवर लावले. नवीन वाहतूक कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना गाडीतील चालवायला दिल्यास त्याच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल केला जातो. अग्रवाल याच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही अशी विचारणा समाज माध्यमातून नागरिकांकडून केली जाऊ लागली होती. त्यानंतर पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला.
ब्लॅक हॉटेलचे व्यवस्थापक आणि कर्मचारी तसेच कोझिज हॉटेलचे मालक आणि कर्मचारी यांच्यावर देखील अल्पवयीन मुलांना मद्य दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच राज्य उत्पादन शुल्कने या ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी करून अल्पवयीन मुलांना मद्य पुरवले जात आहे आणि या संदर्भात दोन्ही हॉटेल विरोधात आरोप पत्र देखील दाखल केले.