पुणे : शहारातील कल्याणी नगर भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालला अटक केली आहे. तिच्याकडे सदर अपघात आणि रक्ताचे नमुने बदलण्यात आल्यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तिला आज (दि. १) पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणी दरम्यान बदलण्यात आले होते. तसेच जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी गाडीमध्ये असलेल्या त्याच्या इतर दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने सुद्धा बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ससून रुग्णालयामधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या त्री-सदस्य समितीने दिलेल्या अहवालात या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते आणि त्या जागी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवानी अगरवालला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आता तिच्याकडे या संदर्भात चौकशी करणार आहेत. तसेच बाल न्याय मंडळाने देखील पुणे पोलिसांना मुलाची चौकशी करण्यासाठी दोन तासांची परवानगी दिली आहे. त्यानुसार पोलीस बाल न्याय मंडळात आरोपी अल्पवयीन मुलाकडे चौकशी करणार आहेत. तसेच त्याच्या आईकडे देखील समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.