Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस सेवेत दरमहा सुमारे 1 लाख फेऱ्या रद्द होत असल्याचे ‘परिसर’ संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये बस सेवेचा दर्जा घसरल्याची नोंद करण्यात आली आहे.

अहवालानुसार, शहराच्या लोकसंख्येनुसार प्रति 1 लाख नागरिकांमागे किमान 60 बस असणे अपेक्षित आहे. मात्र, पुण्यात हे प्रमाण केवळ 22 बस इतके आहे. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी बस उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 1900 ते 2050 बस असून त्यात कंत्राटी बसचे प्रमाण जास्त आहे. नियोजित अंतरापैकी केवळ 88 टक्केच बस धावत असल्याने फेऱ्या अनिश्चित होत आहेत. बसमधील तांत्रिक बिघाडाचे प्रमाण 2.58 टक्क्यांवरून 2.76 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
तिकीट दरवाढ आणि सेवेत झालेली घट यामुळे प्रवासी खासगी वाहनांकडे वळत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. बस अपघातांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असली, तरी ब्रेकडाऊन आणि फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.







