शिरूर, ता. १० : कामगाराने मुलीची छेड काढल्याचा संशय व्यक्त करत संतप्त झालेल्या तिघांनी थेट दूध डेअरीवर धाड टाकून डेअरी चालकाला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील लोंढेमळा परिसरात ८ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात डेअरी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, आरोपींनी डेअरीतील दूधाने भरलेले चार ते पाच कॅन खाली पाडून हजारो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपी पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी संकेत बापू बोऱ्हाडे (वय २८, व्यवसाय – दूध डेअरी, रा. रामलिंग, लोंढेमळा, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार नवनाथ बबन लोंढे, सिद्धार्थ नवनाथ लोंढे (दोघे रा. रामलिंग, लोंढेमळा) तसेच तेजस (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शिक्षक कॉलनी, शिरूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत बोऱ्हाडे हे त्यांच्या रामलिंग दूध डेअरीवर कामगार गणेश हनुमंत मंजरतकर याच्यासह कामात व्यस्त होते. त्याचवेळी तिन्ही आरोपी हातात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन डेअरीवर आले.आरोपींनी “तुमच्या कामगाराने काही दिवसांपूर्वी आमच्या मुलीची छेड काढली आहे,” असा आरोप करत शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी संकेत बोऱ्हाडे यांनी शांततेचा मार्ग स्वीकारत, “जर असा प्रकार झाला असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार द्या; डेअरीवर गोंधळ घालू नका, त्यामुळे व्यवसायाची बदनामी होईल,” असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

समजावून सांगूनही आरोपी अधिक आक्रमक झाले. त्यांनी संकेत बोऱ्हाडे यांना धक्काबुक्की करत खाली पाडले आणि लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये नवनाथ लोंढे याने लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केल्याने संकेत बोऱ्हाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्तस्राव सुरू झाल्याने ते खाली कोसळले.
मारहाणीवरच न थांबता आरोपींनी डेअरीतील दूधाने भरलेले चार ते पाच कॅन खाली पाडल्याचा आरोप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दूध जमिनीवर सांडले आणि आर्थिक नुकसान झाले. या प्रकारामुळे काही काळ डेअरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, संकेत बोऱ्हाडे यांच्या आरडाओरडीनंतर त्यांचे वडील बापू बोऱ्हाडे आणि कामगार गणेश मंजरतकर घटनास्थळी धावून आले. त्यांनी हस्तक्षेप करून संकेत यांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर आरोपींनी “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२, ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वादाचे कारण कामगारावरील कथित छेडछाडीचा आरोप असला तरी कायदा हातात घेऊन थेट व्यवसायस्थळी हल्ला झाल्याने रामलिंग परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.






