पुणे: आयटी क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या खराडी परिसरात 23 वर्षीय संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जान्हवी पाठकल असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार येथील रहिवासी होती. खराडीतील एका नामांकित आयटी कंपनीत ती नोकरी करत होती. प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर आणि कथित मारहाणीनंतर तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

जान्हवी आणि अमृतकुमार अरुणकुमार सिंग (23) हे दोघे शालेय जीवनापासून एकमेकांच्या परिचयाचे होते. अमृतकुमार मूळचा दिल्लीतील पहाडगंज परिसरातील असून तो नोएडा येथील एका आयटी कंपनीत काम करतो. जान्हवी गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यात वास्तव्यास होती. तिला भेटण्यासाठी अमृतकुमार काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दोघांमध्ये एका कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि अमृतकुमारने जान्हवीला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी तो घराबाहेर गेला. काही वेळाने फ्लॅटमध्ये जान्हवी मृतावस्थेत आढळून आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

ही घटना खराडीतील रिव्हर डेल सोसायटीमध्ये शुक्रवारी (28 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपास सुरू केला.
दरम्यान, उत्तर प्रदेशात राहणाऱ्या जान्हवीच्या 49 वर्षीय काकांनी खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमृतकुमार सिंगविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या घटनेमागील नेमके कारण, दोघांमधील वादाची पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत.







