पुणे : पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणून मोठी कारवाई केली. नुकतेच पोलिसांनी तब्बल ३ हजार ७०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. पुणे पोलिसांची ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे. देशभरातील ही मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे, अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे तोंडभरून कौतुक केले. पोलिसांच्या पथकाला त्यांनी २५ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांनी मोठे सहकार्य केले. कुरकुंभ, दिल्ली, सांगली येथे छापे टाकून मेफेड्रोन जप्त केले. पुण्यात अमली पदार्थ तयार करून परदेशात पाठविण्यात येत असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे कौतुक करण्यासाठी शनिवारी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. फडणवीस म्हणाले की, पुणे पोलिसांची ही कारवाई अलीकडच्या काळातील देशभरातील मोठी कारवाई मानली जात आहे. तब्बल तीन हजार ७०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील पोलिसांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अमली पदार्थ विक्री आणि तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही. ते काम अमली पदार्थ करतात. अमली पदार्थांच्या सेवनामुळे आजची तरुण पिढी बरबाद होत आहे. अनेक तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. अमली पदार्थ तस्करी आणि विक्री म्हणजे देशविरोधी गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पेलिसांची कारवाई कौतुकास पात्र आहे, असेही फडणवीस म्हणाले.
या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे उपस्थित होते.