पुणे : पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी विविध गुह्यांचा छडा लावून परत मिळवलेला सुमारे २ कोटी ३१ लाख ५४ हजार ४८९ रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी चोरीस गेलेला ऐवज परत मिळालेल्या नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयातून मुद्देमाल परत करण्याबाबत आदेश प्राप्त करून घेऊन सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम सोमवारी (ता.१) कॉप्स एक्सलन्स हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. यावेळी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर व डेक्कन पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्हयांमधील जप्त करण्यात आलेला मौल्यवान व किंमती मुद्देमाल, रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन, दुचाकी-तीनचाकी वाहने असा मुद्देमाल परत देण्यात आला आहे.
पोलीस ठाणे, गुन्हे व परत देण्यात आलेली रक्कम कंसामध्ये
समर्थ पोलीस ठाणे, २, ३ लाख ९४ हजार ५००,
खडक पोलीस ठाणे, २, २ लाख ७९ हजार ३५० रुपये, मौल्यवान दागिने व ३७ लॅपटॉप
फरासखाना पोलीस ठाणे, ७, २ कोटी, १४ लाख, ९४ हजार ६३९ रुपये, मौल्यवान दागिने, दुचाकी-तीनचाकी वाहने, मोबाईल फोन,
शिवाजीनगर पोलीस ठाणे ७, गुन्हयातील ८ लाख २२ हजार रुपये, सोन्याचे दागिने,
डेक्कन पोलीस ठाणे २ गुन्ह्यातील १ लाख ६४ हजार रुपये, सोन्याचे दागिने असा एकूण २ कोटी ३१ लाख ५४ हजार ४८९ रुपयांचा मुद्देमाल किमती व मौल्यवान मुद्देमाल हा गुन्हयातील फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे.
दरम्यान, खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर व डेक्कन पोलीस ठाणे पुणे शहर या पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणारे समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, रणदिवे, खडक पोलीस ठाण्याचे डोंगळे, फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, उपनिरीक्षक मोकाशी,काळे, पोलीस हवालदार लोंढे, पोलीस अंमलदार मुलाणी, पोलीस हवालदार खाडे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार झांबरे व गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस उपनिरीक्षक मखरे, डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सावंत यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी पोलीस सह आयुक्त पुणे शहर प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ संदीप सिंह गिल, सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर, रूक्मिणी गलंडे, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, समर्थ पोलीस ठाण्याचे मारुती पाटील, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे चंद्रशेखर सावंत, डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक पंधरकर यांनी केले तर समारोप सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी केला.