लोणी काळभोर, (पुणे) : मुंबई येथील एडव्हरटायझिंग कंपनीची बँकेत भरण्यासाठी दिलेली 6 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवरून ताब्यात घेतले आहे.
राज रवींद्र वाल्हे, (वय – 27, रा. ठि. जे. बी. नगर, अंधेरी, पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पराग लॉज, चाचा हलवाई चौक, नाना पेठ, पुणे येथील लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा यूनिट 6 कडील पोलीस पथक हद्दीत गस्त घालीत असताना एम. आय.डी.सी. पोलीस ठाणे मुंबई येथील बी. एन. एस. या गुन्ह्यातील आरोपी राज वाल्हे हा समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत लॉजवर असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा यूनिट 6 कडील पोलिसांना मिळाली होती.
सदर माहितीच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार ताकवणे, पवार यांनी गुन्हे शाखा युनिट 1 येथील पोलीस अंमलदार साळुंके, जाधव, साबळे यांच्या मदतीने हद्दीतील लॉजेसची तपासणी केली. यावेळी आरोपी हा पराग लॉज, चाचा हलवाई चौक, नाना पेठ, पुणे येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी हा फिनवीन ऍडव्हर्टायझिंग कंपनी मुंबई येथे नोकरीस असून मंगळवारी (ता. 22) कंपनीचे मॅनेजर यांनी बँकेत भरण्यासाठी 6 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम दिली होती. सदर रक्कम आरोपीने बँकेत न भरता स्वतः कडे ठेवून मुंबईतून पलायन केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यास माहिती कळवून आरोपीकडून गुन्ह्यातील रोख रक्कम 4 लाख 50 हजार रुपये तपासकामी जप्त करण्यात आले आहेत. आरोपी व हस्तगत मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांच्या परवानगीने एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे मुंबई यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केली आहे.