पुणे : राज्यात नाही तर देशात वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. रोज नव्याने पूजा खेडकर यांचे एकेक कारनामे समोर येत आहे. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटीसा लावल्या आहेत, जेव्हा पोलिस त्यांच्या घरी कारवाईसाठी बाणेर भागातील बंगल्यात पोहोचले तेव्हा तिथे कोणीच नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.
पूजा खेडकरच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथकं तयार करण्यात आली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांची पथके शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेची पथके खेडकर यांचा शोध घेत आहेत. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी शोध घेतला आहे.
याबाबत माहिती देताना पोलिस म्हणाले, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत. ते सापडल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. जो गुन्हा झाला आहे त्याबाबत आम्ही त्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेऊ. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काहीचे मोबाईल नंबर आमच्याकडे नाहीत. त्या सर्वांचा शोध सुरू आहे.