(Pune) पुणे : मोठ्या व्यवहारांपासून ते छोट्या व्यवहारामध्ये आता ऑलनाईन पेमेंट सेवेला प्राधान्य दिले जाते. साधी टपरी वाल्यापासून ते भाजीच्या ठेल्यावर देखील ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची सुविधा उपल्पब्ध असते. त्यामुळे ही सेवा प्रणाली लोकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे पीएमपीने देखील तिकीटाचे पैसे पेमेंट ऍपद्वारे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी पाऊल उचलेले आहे.
एक एप्रिलपासून सर्व बसमध्ये ही सेवा…!
पीएमपीकडून येत्या दोन दिवसांत पीएमपीच्या एका बसमध्ये प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास एक एप्रिलपासून सर्व बसमध्ये ही सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
पीएमपीच्या 369 मार्गांवर सरासरी 1 हजार 600 बसमार्फत सेवा दिली जाते. तिकीट काढण्यासाठी सुटे पैसे नाहीत म्हणून पीएमपी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये रोजच वाद होत असतात. पण, सुट्या पैशावरून होणारे वाद आता टळणार आहेत.
पीएमपीकडून दोन वर्षांपासून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू होते. मात्र त्यात वारंवार अडथळे येत होते. पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार स्वीकारताच पुढाकार घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
पीएमपीत पेमेंट ऍपद्वारे तिकिटाचे पैसे स्वीकारले जाणार आहेत. यासाठीचे सिक्युरिटी ऑडिट पूर्ण झाले असून, पुढील दोन दिवसांत याची एका बसमध्ये प्राथमिक चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर इतर बसमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रसार माध्यमांना दिली.