न्हावरे,ता.30: पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर आज (ता. 30) यवतमाळ पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने विजयसिंह नलावडे यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. मात्र, शासनाने नलावडे यांच्या कारभाराची चौकशी सुरू ठेवण्याचा आदेश कायम ठेवल्यामुळे नलावडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
विजयसिंह नलावडे हे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दरम्यानच्या काळात नलावडे यांच्या कारभारासंदर्भात काही शंका उपस्थित झाल्यामुळे आणि नलावडे यांच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी, यासाठी पुणे जिल्हा भाजपा आयटी सेलचे अध्यक्ष नितीन थोरात यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार कामात दिरंगाई व चुकीचे अहवाल शासनाला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नलावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
विजयसिंह नलावडेंना कुरुळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार नडला
शिरूर येथे गट विकास अधिकारी असताना, कुरुळी येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा निधी व ग्रामपंचायत 15 % टक्के राखीव निधी या योजनांच्या कामामध्ये बोगस व बनावट कागदपत्रे बनवून शासनाची फसवणूक करून केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी खोटे व दिशाभूल करणारे अहवाल शासनाला सादर करणे. तसेच शासनाने पाठवलेली पत्रे विना कार्यवाही, हेतू पुरस्कर प्रलंबित ठेवणे याबाबत नितीन थोरात यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. तसेच नितीन थोरात उद्या (ता. 01) महाराष्ट्रदिनी पुणे जिल्हा परिषद येथे ‘भीक मागो’ आंदोलन करणार होते. त्याच्या पूर्वसंध्येलाच नलावडे यांच्यावर कारवाई झाली आहे.