Pune News : पुणे : कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने १९ ऑगस्टपासून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के भरीव शुल्क आकारले आहे. अर्थ मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे. त्याविरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमधील बाजार समित्या सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहेत. तर पुणे जिल्ह्यात आळेफाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करत आहेत.
आळेफाटा येथे शेतकऱ्यांचे आंदोलन
पुणे जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांना भक्कम साथ दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गेली अनेक वर्ष आम्हाला अनुदान नाही. (Pune News) आमच्यावर अन्याय करु नका, असे शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. आंदोलनाबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर हा विषय मांडला. मी स्वत: कांद्याचा हार घालून त्यांचा सत्कार करेन. राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की, आपला प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तो पर्यंत सगळ्या मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
कोल्हे म्हणाले की, सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जात आहेत. कांदा उत्पादकांना चार पैसे मिळतील अशी अशा निर्माण झाली असताना, सहा-सात महिने पुरेल इतका कांदा देशात उपलब्ध असताना, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे पाप केले आहे. निर्यात शुल्क लादणे ही अघोषित निर्यातबंदी आहे. नेपाळमधून टोमॅटो आयात करून त्याचे दर पाडले आता कांद्याचे दर देखील असेच पाडण्याचे काम सरकार करत असल्याचेही कोल्हे म्हणाले.(Pune News) केंद्रीय नेत्यांचे स्वागत करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती आहे की, जोपर्यंत कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेतले जात नाही, आणि कांद्याला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत केंद्रातील जो नेता महाराष्ट्रात येईल त्याची कांद्याची माळ घालून स्वागत करावं जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दुखः केंद्रातील भाजपच्या नेत्यांना समजेल असेही अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधून त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. (Pune News) केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.