Pune News : पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जानेवारी ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच १५७ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांवरही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नव्या आणि जुन्या अशा मिळून ३८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमुळे काहींचा सरपंच होण्याचा तर अनेकांचा पंचायत समिती सदस्य होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उमेदावारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी दहाच दिवस मिळणार आहेत.
प्रचारासाठी अवघे दहा दिवस!
याबाबत संबंधित तहसीलदार ६ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध करतील. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. (Pune News) ३ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उदेवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
निधन, राजीनामा, अन्य कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचाची पदे रिक्त झालेल्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार असून, यासाठी नेहमीच्या पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या घोषणेमुळे निवडणूक जाहीर झालेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. (Pune News) आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती जोडावी लागणार आहे. तसेच एक वर्षाच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडावे लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तिकीट मिळावे म्हणून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुणे जिल्ह्यातील गावागावांमध्ये फक्त निवडणुकीचीच हवा आहे.
कोणत्या गावात किती जागांवर निवडणुका?
निवडणुका होत असलेल्या ३८८ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक भोर, खेड तालुक्यातील प्रत्येकी ४६ ग्रामपंचायती आहेत. त्या पाठोपाठ आंबेगाव, जुन्नर, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या आहे. आंबेगाव तालुक्यात ४४, जुन्नरमध्ये ४१, बारामतीमधील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. (Pune News) दौंड, शिरूरमधील प्रत्येकी १६, इंदापूर आणि हवेलीतील प्रत्येकी १४, वेल्हे आणि मावळमधील प्रत्येकी ३१, पुरंदरमधील २२, मुळशीतील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
इच्छुकांचे सीमोल्लंघन दसऱ्यापूर्वीच होणार?
सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तासमीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. (Pune News) त्यामुळे इच्छुकांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जाऊ शकतात. दसऱ्यापूर्वीच इच्छुकांचे सीमोल्लंघन सुरू होण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायावर गुंडाचा जीवघेणा हल्ला
Pune News : गेट उघडण्यास उशीर झाला; सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण