Pune News : पुणे : पुण्यासह महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे गेल्या दोन महिन्यांत घडत असलेल्या घटनांवरून अधोरेखित झाले आहे. कोयता गॅंगची दहशत असो, वा भर दिवसा तरुणीवर कोयता हल्ला करणे असो, या प्रकारांमुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकारांमध्ये भर घालणारी घटना नुकतीच घडली आहे. नाशिक-पुण्यात सध्या टोळक्याने हैदोस घातला आहे.
पोलीस अॅक्शन मोडमध्ये
कोयता हाती घेऊन दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणे या घटनांनी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून, जिथे दहशत माजवण्याचे प्रकार झाले, तेथेच पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत. तर पोलिसांच्या अॅक्शनचे कौतुक होत आहे.
पुण्यात दोन दिवसांपूर्वी सिंहगड रोड परिसरात हॉटेलची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर पुण्यातील हवेली पोलिसांनी तत्काळ गुन्हेगारांची धिंड काढली. (Pune News) तोडफोड केली त्याचठिकाणी पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली. तसेच भर रस्त्यात गुन्हेगारांना चोप दिला. वैभव इक्कर आणि चेतन चोरघे अशी या दोन गुन्हेगारांची नावे आहेत. या कामगिरीबद्दल हवेली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, अशीच घटना नाशिकमध्ये नाशिकरोड आणि विहितगाव येथे चारचाकी, दुचाकी गाड्या जाळल्याची आणि फोडल्याची घटना सलग दोन दिवस घडली. (Pune News) या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण होते. यामुळे या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत समाजकंटकांची परिसरातून धिंड काढली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विहितगाव आणि धोंगडेनगर येथे भर पावसात या संशयित आरोपींची धिंड काढण्यात आली.
या प्रकारामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.