पुणे : वारजे माळवाडी व फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह गंभीर गुन्हे करून दहशत माजविणार्या शेखर रविंद्र खवळे (वय २३, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे-माळवाडी, पुणे) याच्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून, स्थानबद्ध केले आहे. एमपीडीए अन्वये पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ४३ कारवाया केल्या आहेत.
वारजे माळवाडी व फरासखाना ठाण्यांच्या हद्दीत शेखर खवळे हा कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे, विनयभंग यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. त्याच्यावर गेल्या ५ वर्षांमध्ये ४ गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.
दरम्यान, या गुन्हेबारावर स्थानबद्धतेची कारवाई व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची छाननी करून आयुक्तांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई केली आहे. वर्षभरासाठी त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, गुन्हे शाखेतील पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी खवळेला स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आणि छाननी केली. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ४३ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून, त्यांना स्थानबद्ध केले आहे.