Pune News : पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसावा यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकतेच मोक्का कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले. याच दरम्यान एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. तरुणाला शिवीगाळ करत, अर्धनग्न करुन बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. बदनामी करत असल्याच्या संशयावरून ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या मारहाणीचा व्हिडीओ पीडित तरुणाच्या ओळखीच्या लोकांना पाठवल्यामुळे खळबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी पीडित तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रविवारी (ता. २०) फिर्याद दिली असून, दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News ) राहुल व्यवहारे व शिवशंकर कडू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका २८ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News ) पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३२३, ५००, ५०४, ५०६ सह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हा धक्कादायक प्रकार १४ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मीनारायण मंदिराजवळ घडला होता. आरोपी राहुल आणि शिवशंकर यांना फिर्यादी हा आपली बदनामी करतो असा संशय होता. याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादीला अर्धनग्न करुन बेदम मारहाण केली.(Pune News ) ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आरोपींनी अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो फिर्यादीच्या क्षेत्रातील लोकांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. तसेच यापुढे इव्हेन्ट करायचा नाही, असे सांगून जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गिरीशकुमार दिघावकर करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तरुणाला अडवून, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; तिघे पोलिसांच्या ताब्यात