Pune News : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. १) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याला अवघ्या काही तासांचा अवधी असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील कोणते रस्ते केव्हा बंद राहतील, याचे नेमके नियोजन नागरिकांपर्यंच पोहोचलेले नसल्याने पुणेकरांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सकाळी सहापासून दुपारी तीनपर्यंत आवश्यकतेनुसार रस्ते बंद राहतील, अशा पोलिसांच्या मोघम आदेशामुळे मंगळवारी शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलांना पाठवायचे का, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर पडायचे की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे.
पोलिसांच्या मोघम आदेशामुळे संभ्रम
दरम्यान, परिसरातील शाळा-आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार की बंद, याबाबत पोलिस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसल्याने शहरातील काही शाळांनी मंगळवारी सुटी जाहीर केली आहे. तर काही शाळा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दहा ते दुपारी अडीच या वेळेत पुण्यात असणार आहेत. मोदी पुण्यात आल्यानंतर त्यांचा वाहन ताफा विद्यापीठ रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी मोदी यांच्या दौऱ्यात कार्यक्रमाचे ठिकाण आणि प्रवासाच्या मार्गावरील दुकाने बंद ठेवण्यास सांगितले गेले होते. (Pune News) आता मोदी यांचा दौरा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना, अद्याप पोलिसांकडून कोणतेही चित्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून स्पष्ट माहिती मिळाली नाही. जिल्हा प्रशासनाकडे विचारणा करून त्याबाबतची अधिक माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता परिसरात अनेक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी असंख्य वाहने टिळक रस्ता, शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्त्याने ये-जा करतात. (Pune News) वाहतूक पोलिसांनी आवश्यकतेनुसार सकाळी सहापासून रस्ते बंद करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. मात्र, कोणते रस्ते केव्हा बंद राहणार, हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या रस्त्यांवरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळा सुरू राहणार की बंद ठेवायच्या याबाबत जिल्हा प्रशासनाने शाळा व्यवस्थापनांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेसाठी घेण्यात येणारी खबरदारी पाहता अनेक शाळांनी त्या दिवशी ऑनलाइन शाळा घेण्याचे नियोजन केले आहे. (Pune News) तर दहावीच्या पुरवणी परीक्षाही काही केंद्रांवर मंगळवारी नियोजित आहेत, याबाबत सरकारी यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आले.
आचार्य आनंदऋषिजी चौक (पुणे विद्यापीठ चौक), भाऊसाहेब खुडे चौक (सिमला ऑफिस चौक), नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संचेती हॉस्पिटल), स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक चौक, अलका थिएटर, टिळक रस्ता, जेधे चौक, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, संगमवाडी रस्ता, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता असे रस्ते सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत बंद राहतील, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे. पुण्यातील बहुसंख्य वाहतूक याच रस्त्यांवरून होते. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेरच पडायचे नाही का? अशी विचारणा केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ऑनलाइनमधून बनावट औषधांचा धोका वाढतोय – माजी आमदार जगन्नाथ शिंदे…
Pune News : पुण्यात वाहनसंख्या पोहोचली ३६ लाखांवर; गेल्या वर्षभरात अडीच लाख वाहनांची भर!
Pune News : एटीएसने आणखी एकास केली अटक ; दहशतवाद्यांना मदत केल्याचा ठपका!