Pune News : पुणे : तब्बल १५ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी चेन्नईहून अटक केली. ललित पाटीलच्या चौकशीमधून अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी खळबळजनक माहिती दिली आहे. ललित पाटीलला भाजपच्या एका मंत्र्याचा, आमदाराचा राजकीय वरदहस्त असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. याच मंत्र्याच्या मदतीमुळे ललित पाटील ससून रूग्णालयातून मोठ्या शिताफीने निसटू शकला. येत्या काही दिवसांत या सगळ्या मंत्र्यांची नावे जनतेसमोर येतील, असेही धंगेकर यांनी म्हटले आहे.
ससूनचे डीन, पुणे पोलीस, येरवडा कारागृहातील पोलीस या सगळ्यांचा गॉडफादर कोण?
ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांनी १० जणांचे पथक त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या शहरात पाठवले होते. मात्र,तो पुणे पोलिसांच्या हाती लागला नाही. मुंबई पोलिसांनी बंगळूरुहून चेन्नईला त्याला ताब्यात घेतले. (Pune News0 या प्रकरणाशी अनेकांचे लागेबांधे जोडलेले आहेत. येत्या काही दिवसांत ड्रग्ज प्रकरणातील सर्व मंत्र्यांची नावे पुढे येतील, असेही त्यांनी सांगितले.
ललित पाटील प्रकरणी आमदार धंगेकर यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले होते. पुणे पोलीस या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावू शकतील का, याबाबत त्यांनी पत्रातून शंका व्यक्त केली होती. हे प्रकरण सी.आय.डी कडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना धंगेकर म्हणाले की, ललित पाटीलचा ड्रग्जचा मोठा व्यवसाय असून, तो करोडो रुपये कमवतो. पैशांच्या जोरावर त्याला ससूनमध्ये दाखल असतानाही पंचतारांकित सेवा मिळत होत्या. आता तो म्हणतो, मी पळालो नाही, मला कोणीतरी पळवलं… या प्रकरणाची आता केंद्रीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे. (Pune News) ससून रूग्णालयात गेली ९ महिने तळ ठोकून बसलेल्या या कैद्याला पोलीस, ससूनचे डॉक्टर आणि येरवडा कारागृहातील अधिकारी संरक्षण देत आहेत. त्यांना सहआरोपी करुन तुरुंगात टाकले पाहिजे, अशी संतप्त मागणी धंगेकर यांनी केली. ससूनचे डीन, पुणे पोलीस, येरवडा कारागृहातील पोलीस या सगळ्यांचा गॉडफादर कोण आहे, हे समोर आले पाहिजे, असेही धंगेकर यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : फ्लॅटवर जागामालकाचे अतिक्रमण; बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल
Pune News : अजितदादांवर केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात ; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण..