गणेश सुळ
Pune News : केडगाव (पुणे) : साखर कारखान्यांना यंदाचे ऊस गाळप करणे आव्हानात्मक ठरणार आहे. कारखान्याने जर ३,५०० रुपयांच्या आसपास बाजारभाव दिला, तर गुर्हाळाला फटका बसू शकतो. शिवाय तालुक्यात ४ कारखाने व ५०० गुऱ्हाळे असल्याने, जो जास्त भाव देईल, तोच ऊस नेईल, अशी परस्थिती उद्भवण्याची शक्यता ‘पूणे प्राईम न्यूज’च्या माध्यमातून वर्तविली होती. ती सत्यात उतरत असल्याची वस्तुस्थिती आहे. दौंड तालुक्यात उसाच्या नोंदी दोन-दोन कारखान्याच्या; परंतु ऊस तिसऱ्याच कारखान्याला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऊसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्या दौंड तालुक्यात दसर्यापासून कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. मात्र, या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटले आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. साखर भरण्याची वेळ असतानाच पाणी न मिळाल्याने वजन आणि साखर उतार्यावरही परिणाम जाणवत आहे. त्यातच तालुक्यातील गुर्हाळे ही ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगला बाजारभाव देत असल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी कारखाना हंगाम सुरू होण्याच्या आधीच गुर्हाळाला ऊस घालण्यास सुरुवात केली होती. परिणामी, तालुक्यातील साखर कारखान्यांपुढे गळीत हंगामाला गुर्हाळांचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती.
दौंड तालुक्यात भीमा पाटस सहकारी कारखान्यासह अनुराज शुगर (यवत), श्रीनाथ म्हस्कोबा (पाटेठाण) आणि दौंड शुगर (आलेगाव) असे चार साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षी भीमा पाटस कारखाना सुरू झाला आणि गुर्हाळाबरोबरच इतर साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला याचा फटका बसला गेला. मात्र, या वर्षी गुर्हाळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजारांच्या पुढे बाजारभाव दिला आहे. परिणामी, दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा गुर्हाळांकडे वळत आहेत. दौंड तालुक्यातील गुर्हाळांची दुकानदारी बंद करायची असेल तर साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्यांना गुर्हाळांच्या बरोबरीने अपेक्षित बाजारभाव देणे गरजेचे आहे. गुर्हाळाच्या तोडीत जर साखर कारखान्यांनी बाजारभाव दिला, तर शेतकरीवर्ग साखर कारखान्यांना ऊस घालेल व कारखान्यांच्या गळीत हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, हे नक्की आहे.
सध्या सर्व कारखान्यांनी ३ हजार रुपयांवरून बाजारभाव जाहीर केले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व कारखाने ३,५०० रुपयांच्या पुढे बाजारभाव देतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.