Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गुन्ह्यांचे बदलते स्वरूप विचारात घेऊन पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्याला चार निरीक्षक देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एक निरीक्षक पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी असेल, तर एका निरीक्षकावर सायबर पथकाची जबाबदारी असेल. याचप्रमाणे ग्रामीण भागातील गुन्हेगारी पाहता, पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस ठाण्यांमध्ये एका निरीक्षकासह तीन सहायक निरीक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
बदललेली सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, समाज माध्यमांचा प्रसार, गुन्ह्यांचे बदललेले स्वरूप या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांची फेररचना करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने नुकताच घेतला आहे. (Pune News) हे निकष ठरविताना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या अहवालातील शहरी आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांसाठी निश्चित केलेल्या मापदंडाचा अभ्यास करण्यात आला. राज्यातील ११ पोलीस आयुक्त कार्यालये आणि ३७ अधीक्षक कार्यालयांना नवीन निकषांनुसार रचना करून प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.
प्रत्येकी ५० हजार लोकसंख्येमागे एक पोलीस चौकी असावी, असे धोरण ठरवण्यात आले आहे. प्रत्येक चौकीला एक सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी प्रमुख असेल. चौकीतील एकूण मनुष्यबळ १० असेल. शहर पोलीस आयुक्तालयाच्या रचनेनुसार सध्या पोलीस ठाणे अंमलदार म्हणून सहायक उपनिरीक्षक किंवा पोलीस हवालदार यांची नेमणूक केलेली असते. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची नोंद या अंमलदारांकडून घेतली जाते. नवीन निकषानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याला अंमलदार म्हणून दोन उपनिरीक्षक नेमण्यात येणार आहेत. तसेच त्यांना मदतनीस म्हणून दोन हवालदार आणि सहा शिपाई असतील.
तपास पथकामध्ये ५० गुन्ह्यांसाठी एका सहायक निरीक्षकासह दोन उपनिरीक्षक आणि एक सहायक उपनिरीक्षक यांचा समावेश असेल. (Pune News) तर, पुढील प्रत्येक ५० गुन्ह्यांच्या तपासासाठी एक उपनिरीक्षक, एक सहायक उपनिरीक्षक आणि एक हवालदार अशी वाढ करण्यात येईल. त्यानुसार पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या एकूण गुन्ह्यांचा आढावा घेऊन तपास पथकासाठीचे मनुष्यबळ निश्चित करण्यात येईल.
दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर पथक नेमले जाणार असून, निरीक्षकाकडे या पथकाचा पदभार असेल. राज्य सरकारच्या निर्णयानुसार नवीन निकषांच्या आधारे पोलीस ठाण्यांच्या मनुष्यबळाची फेररचना करून, आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन, दोन पिस्टलसह ७ काडतुसे जप्त
Pune news : प्रमोद भाईचंद रायसोनी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल; ११ कोटी २३ लाखांचा अपहार
Pune News : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीकडून ९६ जादा गाड्या सोडणार…