Pune News : पुणे : गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलीसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा… या काव्यपंक्तीची प्रचिती फरासखाना पोलिसांच्या कार्यतत्परतेतून दिसून आली. दिवाळीनिमित्त खरेदी केलेल्या कपड्यांची बॅग ते रिक्षातच विसरले. फरासखाना पोलिसांनी वेळ न दवडता रिक्षाचा क्रमांक शोधून, रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सोमवारी (ता. ३०) संबंधित नागरिकांना परत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बनकर कुटूंब भारावून गेले. यंदा दिवाळीपूर्वीच दिवाळी ‘गोड’ झाल्याची भावना बनकर कुटूंबाने व्यक्त केली.
फरासखाना पोलिसांची कार्यतत्परता
ही घटना रविवारी (ता. २९) सायंकाळी चारच्या सुमारास फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सागर मच्छिंद्र बनकर (रा. वाघोली) हे रविवारी कुटुंबासह पुण्यात दिवाळीची खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी मुलचंद मिल येथून कपडे खरेदी केले.(Pune News) त्यानंतर दत्त मंदिर येथून रिक्षात बसून कुंभारवाडा चौक येथे उतरले. रिक्षातून उतरत असताना खरेदी केलेल्या सुमारे ९,२३८ रुपये किंमतीच्या साड्यांची बॅग रिक्षातच विसरली. बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत कपड्यांची बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार दिली.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर व तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी दत्त मंदिर चौक ते कुंभार वेस चौक यादरम्यान असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. (Pune News) पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षाचा क्रमांक ट्रेस करुन रिक्षा चालकाला शोधून काढले. पोलिसांनी रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सागर बनकर यांना परत केली.
पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे भारावलेल्या बनकर कुटूंबाने फरासखाना पोलिसांचे मनापासून आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे नगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; चौघे जखमी