Pune News : पुणे महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राजकीयदृष्ट्या बचावाच्या भूमिकेत गेलेले रवींद्र धंगेकर आता पुन्हा आक्रमक झाले आहेत. पत्नी आणि मुलगा दोघांचाही पराभव, शिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिंदे गटाला एकही जागा न मिळाल्याने धंगेकरांवर मोठा राजकीय दबाव होता. मात्र या पराभवाच्या धक्क्यातून सावरत त्यांनी थेट भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे आणि तोही अत्यंत वादग्रस्त भाषेत.

वादाची ठिणगी कुठे पडली?
नवी मुंबईतील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून हा संघर्ष उफाळून आला. नवी मुंबई महापालिकेसाठी रुग्णालये, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी मागवलेले भूखंड सिडकोकडून मिळण्याऐवजी बिल्डरांच्या फायद्यासाठी वळवले गेल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला. त्यांनी या संदर्भात नगरविकास खात्यावर बोट ठेवले, जे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे.
नाईक यांनी टीकेचा रोख वाढवत शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही थेट निशाणा साधला. “परवानगी मिळाली तर मी त्यांना माजी खासदार करून दाखवेन,” असे आव्हान देत त्यांनी राज्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वक्तव्याने महायुतीतच अंतर्गत तणाव असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
धंगेकरांचा आक्रमक पलटवार
या टीकेनंतर धंगेकरांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यात एकनाथ शिंदे यांना रथावर स्वार दाखवले आहे, तर गणेश नाईक यांचा चेहरा लावलेला कुत्रा भुंकताना दाखवण्यात आला आहे. “कुत्र्याने आपल्या दगडाच्या खाणी राखाव्यात… विकासाशी स्पर्धा करण्याची त्याची लायकी नाही,” असा मजकूर त्या पोस्टमध्ये होता. ही भाषा आणि चित्रफित राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरली आहे.
पुण्यातील पराभवानंतर शांत असलेले धंगेकर अचानक आक्रमक झाले, यामागे राजकीय पुनर्स्थापनेचा प्रयत्न असल्याचे जाणकार मानतात. स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवण्याची आणि शिंदे गटात आपली निष्ठा अधोरेखित करण्याची ही रणनीती असल्याचे बोलले जाते.
श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनीही नाईकांना प्रत्युत्तर देताना वैयक्तिक टोमणे लगावले. “वयानुसार विसरभोळेपणा आणि चिडचिडेपणा येतो, मी स्वतः डॉक्टर आहे,” असे म्हणत त्यांनी नाईकांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. तसेच, “ठाणे किंवा कल्याणमधून निवडणूक लढवून दाखवा, मी समोर उभा राहीन,” असे खुले आव्हान देत त्यांनी आपली राजकीय ताकद अधोरेखित केली.






