Bhosari : “भोसरीचा भाई” असल्याचा धाक दाखवत अंडा बुर्जीच्या दुकानावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना 13 जुलै 2023 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील टोळी प्रमुखाला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष मोक्का व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किशोर शिंदे यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती अॅड. विपुल दुशिंग व अॅड. सर्वेश निकम यांनी दिली.

सुदर्शन उर्फ पिल्या राक्षे असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मेघराज मंटाळे (वय 32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौफुला चौकातील अंडा बुर्जीच्या दुकानात करण राठोड, पत्या उर्फ प्रथमेश कांबळे आणि त्यांच्या साथीदारांनी धुडगूस घातला. “अंडा बुर्जी त्वरित द्या” अशी मागणी करत त्यांनी कामगार परवीन इनामदार यांच्याशी वाद घातला आणि लगेचच मारहाण सुरू केली.

परिस्थिती चिघळताच आरोपींनी दुकानातील लोखंडी तवा, रॉड आणि लाकडी बॅटचा वापर करून मेघराज मंटाळे व त्यांच्या कामगारांवर बेछूट हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आरोपींनी कामगार हुसेन इनामदार यांच्या खिशातील सुमारे 8 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड करत मोठे नुकसान केले. “इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पाहिजे ते लगेच द्यावे लागेल, नाहीतर जीव घेऊ,” अशी उघड धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेदरम्यान आरोपींपैकी एकाने “मी भोसरीचा भाई आहे” असे म्हणत लोखंडी रॉड फिरवत उपस्थितांना धमकावले, त्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात करण राठोड, पत्या उर्फ प्रथमेश कांबळे, पिल्या राक्षे आणि अन्य एका साथीदाराविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींवर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या खटल्यात आरोपी सुदर्शन उर्फ पिल्या राक्षे याने अॅड. विपुल दुशिंग व अॅड. सर्वेश निकम यांच्या मार्फत विशेष मोक्का व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात आरोपींविरोधात ठोस पुरावा नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी पिल्या राक्षे याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.







