हडपसर, ता. 2 : रिक्षाने दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. रिक्षा व्यवस्थित चालविण्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून रिक्षातील तिघांनी तरुणाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बापू कल्याण येवले (वय 32, रा. दामोदर विहार, शेवाळवाडी, हडपसर) यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवले यांचा लोणी टोलनाका येथे जुन्या चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. 30 ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास नवीन मोबाईल खरेदी करून ते मित्र रोहित मारुती पवार याच्यासोबत दुचाकीवरून हडपसरहून शेवाळवाडीकडे घरी जात होते.

दरम्यान, 15 नंबर सिग्नल ओलांडल्यानंतर सुमारे 50 मीटर अंतरावर, किंग हॉटेलजवळ त्यांच्या दुचाकीला एका रिक्षाने कट मारला. यावेळी येवले यांनी रिक्षाचालकाला व्यवस्थित रिक्षा चालविण्याबाबत सांगितले. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. रिक्षाचालकाने दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर येवले यांनी दुचाकी बाजूला घेतली. त्यानंतर रिक्षातील चालकासह मागील सीटवर बसलेले दोन जण खाली उतरले. तिघांनी शिवीगाळ सुरू केली.

येवले आणि त्यांचा मित्र रोहित यांनी व्यवस्थित बोलण्यास सांगितले असता, तिघांपैकी एकाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून येवले यांच्या डोक्यात मारला. तसेच रोहित यालाही मारहाण केली आहे. हल्ल्यानंतर येवले यांनी 15 नंबर सिग्नलच्या दिशेने धाव घेतली. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने त्यांनी रिक्षाला हात करून स्मृती हॉस्पिटल गाठले आणि उपचारासाठी दाखल झाले. याप्रकरणी रिक्षातील तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध कायदेशीर तक्रार देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







