नवी दिल्ली: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वर्षातून 2 वेळा महागाई भत्त्यात बदल केला जातो. आता जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या पुढील महागाई भत्त्याच्या वाढीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए आणि पेन्शनर्सचा डीआर 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचला. आता जुलैपासून पुन्हा सुधारणा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी वाढ होऊ शकते.

महागाई भत्त्याच्या वाढीसाठी ऑल इंडिया कंज्यूमर प्राइज इंडेक्स म्हणजेच AICPI-IW च्या आकडेवारीचा आधार घेतला जातो. या निर्देशांकातील बदलांवरून यंदाच्या पुढील वाढीबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभाव्य वेतनवाढीची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8 व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे काम सुरू आहे. वेतन, पेन्शन, भत्ते आणि सेवाशर्तींमध्ये आवश्यक बदलांबाबत आयोगाकडून माहिती आणि मते जाणून घेतली जात आहेत. आयोग मे-जून 2027 पर्यंत केंद्र सरकारकडे आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीए वाढीसोबतच 8 व्या वेतन आयोगाच्या निर्णयाकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.






