Bengaluru News: बेंगळुरू: बेंगळुरू शहरातील नॉर्थ तालुक परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून दुसऱ्या बाळाच्या आगमनाच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मॅटर्निटी फोटोशूट सुरू असतानाच तीन वर्षांच्या मुलाचा खेळता खेळता दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Heartbreaking incident)

मृत मुलाचे नाव लक्षमीर असे असून त्याचे वडील चरण आणि आई स्वाती हे दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी करत होते. स्वाती आठ महिन्यांची गरोदर असल्याने हा खास क्षण आठवणींसाठी जतन करण्यासाठी कुटुंबीयांनी मॅटर्निटी फोटोशूटचे आयोजन केले होते. फोटोशूटसाठी फोटोग्राफरही घरी आला होता आणि सर्वजण शूटमध्ये व्यस्त होते. याच दरम्यान लक्षमीर घराजवळ खेळत होता.
खेळताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो जवळच असलेल्या पाण्याने भरलेल्या पूलमध्ये पडला. फोटोशूटच्या गडबडीत मुलाचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही. काही वेळानंतर मुलगा दिसत नसल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. तेव्हा लक्षमीर पूलमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यानंतर मुलाचे शवविच्छेदन नेलमंगला शासकीय रुग्णालय येथे करण्यात आले. या प्रकरणी मदनाखानहल्ली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. फोटोशूटदरम्यान आवश्यक सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती का, तसेच कोणाकडून हलगर्जीपणा झाला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आनंदाचे क्षण दुःखात बदलले असून कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.





