Crime News: सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) तालुक्यात शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day) दिवशी एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा हे सुरक्षिततेचे ठिकाण मानले जाते, मात्र अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी ही पीडित आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संबंधित शिक्षकाने तिला वर्गाबाहेर बोलावले. घाबरल्यामुळे ती आपल्या तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तीन मुलींना वर्गात पाठवून पीडित मुलीला एकटीला थांबवले. त्यानंतर शिक्षकाने तिला यापूर्वीही बोलावत असल्याचे सांगत तिच्याशी वैयक्तिक स्वरूपात बोलण्याचा प्रयत्न केला.
शिक्षकावर गुन्हा दाखल
आरोपानुसार, शिक्षकाने “मी तुझ्यावर प्रेम करतो” असे म्हणत तिचा हात पकडला. ही घटना घडताच मुलगी घाबरली आणि तिने हात झटकून थेट वर्गात धाव घेतली. नंतर तिने हा प्रकार आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.






