पुणे: राज्यातील प्राध्यापक भरतीला पुन्हा एकदा विलंबाचा फटका बसताना दिसत असून उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये हजारो जागा रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर प्राध्यापक भरतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना भरती प्रक्रियेबाबत नवी माहिती दिली. यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये मार्चअखेरपर्यंत भरती पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता ही प्रक्रिया जून 2026 अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या प्राध्यापक भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होऊन अर्ज प्रक्रिया आणि छाननी पूर्ण झाली आहे. आता मुलाखती आणि नियुक्तीचा अंतिम टप्पा बाकी आहे. राज्यात सुमारे 5,500 प्राध्यापक आणि 2,900 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठांमध्ये 700 प्राध्यापक पदे भरण्यात येणार आहेत.

ही भरती गेल्या 20-25 वर्षांतील सर्वात मोठी भरती ठरणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. या पदांची भरती पूर्ण झाल्यानंतर तासिका तत्त्वावरील (CHB) प्राध्यापकांची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचाही विचार सुरू आहे. सध्या 900 रुपये असलेले मानधन 1,200 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पुढील काळात घेतला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
वारंवार पुढे ढकलली जाणारी भरती प्रक्रिया, रिक्त पदांचा वाढता ताण आणि उमेदवारांचे आंदोलन यामुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. आता जूनअखेर दिलेली नवी डेडलाईन प्रत्यक्षात पूर्ण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







