पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी नानासाहेब आंबनावे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीने हवेली तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

माजी उपसभापती मनीषा हरपळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. उपसभापतीपदासाठी आंबनावे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडीमुळे बाजार समितीच्या संचालक मंडळातील एकजूट आणि परस्पर समन्वयाचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

उपसभापतीपदाच्या निवडीचा ठराव संतोष नांगरे यांनी मांडला, तर शशिकांत गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी आंबनावे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी सभापती प्रकाश जगताप, माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक राजाराम कांचन, गणेश घुले, प्रशांत काळभोर, नितीन दांगट, दत्तात्रय पायगुडे, सुदर्शन चौधरी, लक्ष्मण केसकर, सारिका हरगुडे, मनीषा हरपळे, रविंद्र कंद, संतोष नांगरे यांच्यासह माहिती सेवा समितीचे संस्थापक चंद्रकांत वारघडे, ईश्वर गाडुते, मिलिंद हरगुडे, संदेश आव्हाळे, राजेंद्र खांदवे, नवनाथ काकडे आदी उपस्थित होते.

शेतकरी हिताला प्राधान्य देणार
निवडीनंतर नानासाहेब आंबनावे यांनी सभापती प्रकाश जगताप आणि संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. बाजार समितीच्या विकासासाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बाजार समितीच्या कामकाजात समन्वय साधून शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीशी संबंधित घटकांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे आंबनावे यांनी सांगितले. विकासाभिमुख भूमिका घेऊन बाजार समितीच्या प्रगतीला हातभार लावण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






