आदित्य बोराटे –

इंदापूर : कामासाठी घराबाहेर पडलेल्या 75 वर्षीय महिलेचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. सरडेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत सरडेवाडी टोलनाक्याजवळ गुरुवारी (दि. ३) सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालाबाई सोपान काळे (वय 75, रा. शहा, ता. इंदापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा चंद्रकांत सोपान काळे (वय 50) यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लालाबाई काळे या कामासाठी जात असताना सरडेवाडी टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्याकडून पेरू घेण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने (एन एल ०१ एसी ८६८८) त्यांना धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या धडकेत लालाबाई काळे यांच्या डोक्याला, हाताला, पायाला तसेच शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कंटेनरचालक राकेशकुमार सूर्यनारायण चतुर्वेदी (रा. शाहापूर, जौनपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी 12.26 वाजता इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा दुरगुडे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार यादव करीत आहेत.







