पुणे: पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी भरधाव ट्रक आणि स्कुटीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत स्नेहल अहिनवे (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, धडक इतकी भीषण होती की ट्रकचे चाक स्नेहल यांच्या डोक्यावरून गेल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत स्नेहल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ओतूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद घेत तपास सुरू केला आहे. ट्रकचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण, जबाबदारी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले का, याचा सखोल तपास केला जात आहे.







