Pune News : तळेगाव, (पुणे) : मुंबई-पुणे महामार्गावर मित्रांची वाट पाहत थांबलेल्या एका 20 वर्षीय तरुणाला अनोळखी ४ जणांनी चाकुने भोकसून खून केल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे परिसरातील निलया सोसायटीजवळ घडली आहे.
कृष्णा कैलास शेळके (वय-२०, राऊतवाडी, करुंज, पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मित्र धृव नवनाथ बोऱ्हाडे (वय- १७, राऊतवाडी, करुंज, पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४ अज्ञात इसमांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आठ वाजण्याच्या सुमारास कृष्णा शेळके, व त्यांचे मित्र तळेगाव दाभाडे येथे पिक्चर पाहण्याकरीता निघाले होते. कृष्णा शेळके याने फोन केल्याने तृतीय पंथीयांना भेटण्याकरीता निलया सोसायटीजवळील ते अंधारात वाट पाहत थांबले होते.
त्याठिकाणी आलेल्या ४ अनोळखी इसमांनी इथे का थांबला आहे? असे विचारले. त्यावर कृष्णा शेळके याने कुठं काय असंच थांबलो आहे, असे म्हणाल्याचा राग आल्याने अंगाने सडपातळ, अंगात पांढ-या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या एका अनोळखी इसमाने कृष्णा शेळके याच्या कानाखाली मारली. त्यांच्यात झटापट सुरु झाल्याने चार अनोळखी इसमांनी हाता-बुक्क्यानी मारहाण केली. त्यातील एकाने चाकू काढुन चाकुने कृष्णा शेळके याच्या छातीत, पाठीत आणि डोक्यात भोकसून त्यास ठार मारले.
दरम्यान, याबाबत स्थानिकांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील आणि सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. सदर पोलीस तपास करीत आहेत.