Pune News : पुणे : राजकारणात काय करायचे ते करा; पण तालुक्यातील सहकारी संस्थांना जपले पाहिजे. भिमाशंकर सहकारी साखर कारखाना १३७ कोटी ७९ लाख रूपयांचा निधी उभा करून इथेनॅाल प्रकल्प उभा करत आहे. इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत भिमाशंकर कारखान्याची गाळप क्षमता उत्तम आहे. इथेनॅाल प्रकल्प सुरू झाल्यावर ऊस उत्पादकांच्या मागणीचा विचार करून योग्य तो भाव दिला जाईल. २०२२-२३ साठी गाळप केलेल्या उसाला प्रतिटनास एफ आरपीप्रमाणे २७५० रूपये आणि अंतीम हप्ता ३५० असा एकूण ३१०० रूपये बाजारभाव देण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक संचालक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पारगाव (ता. आंबेगाव ) दत्तात्रेयनगर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याची २०२२-२३ यावर्षीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. (Pune News) त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, आमदार अतूल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, किरण वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती वंसतराव भालेराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, विश्वास कोहकडे, प्रकाश पवार, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, डिंभे धरणामध्ये बोगदा झाल्यास तीन महिन्यांत धरण रिकामे होणार आहे. त्यातून तालुक्याला दुष्काळाची झळ बसणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. यावर्षी राज्यात १६ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहिर झाला आहे. (Pune News) आंबेगाव, शिरूर तालुक्यात देखील दुष्काळ असून, चारा आणि पाण्याची समस्या मोठी आहे. भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने प्रतिदिनी गाळप क्षमता चार हजार टनांवरून सहा हजार टनांवर नेली. यापुढे ती नऊ हजार टनांवर नेण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड तालुक्यांमध्ये नद्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यात पडणारे पावसाचे पाणी जेवढे असेल, तेवढाच साठा होईल. त्यानंतर धरणातून पाणी सोडले जाणार नाही, असे निर्णय भविष्यात होऊ पहात आहेत. डिंभा धरणाचे पाणी नेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. (Pune News) मी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो; पण जिल्ह्यात कधीही पाण्यावरून भांडण झाले नाही. पण भविष्यात पाण्यावरून लढाया होतील, हे विसरून चालणार नाही, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले की, २०२२-२३ मध्ये ९ लाख १९ हजार ९८३ टनाचे गाळप करून ११.५७ टक्के साखर उताऱ्याने १० लाख ६५ हजार ९५२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सहवीज निर्मिती प्रकल्पातून १९ कोटी ७३ लाख रूपये अतिरिक्त उत्पादन मिळेल.
कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले की, गेल्या आठ ते दहा वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला आहे, त्या शिरूर, आंबेगाव, खेड येथील ५७७७ शेतकऱ्यांच्या अनामत रकमा म्हणून ४ कोटी ४० लाख रूपये जमा आहेत. त्यांचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पडून आहे. (Pune News) त्या शेतकऱ्यांना सभासद करून घ्या. सभासदांचा अपघात विमा कारखान्याने उतरावा. ऊसाला जास्तीचा ३३२८ रूपये एवढा बाजारभाव देता येतो. भिमाशंकर कारखान्याने इंजीनिअरींग, फार्मसी विद्यालय सुरू करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
सभेचे सूत्रसंचालन डॅा. सुदाम खिल्लारी व निलेश पडवळ यांनी केले. भिमाशंकर कारखान्याकडून अनेक गावांचा व स्पर्धेत नंबर पटकावणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका पाहता येणार
Pune News : बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यास मांजरी खुर्द येथून अटक
Pune News : खडकीतील गुंड किशोर गायकवाड व साथीदारांवर ‘मोक्का’ कारवाई