संतोष पारधी
वाकी बुद्रुक, ता.०१: पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छतेसाठी पुणे येथील स्वराज्य संघाने विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत संघाने नदीपात्रातून जवळपास फाटकी कपडे, निर्माल्य आदी जवळपास १० टन कचरा गोळा केला आहे.
स्वराज्य संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य संघ आयोजित पंढरपूर चंद्रभागा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, थेऊर व नळदुर्ग धाराशिव जिल्ह्यातील अनेक मावळे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोहिमेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला
या मोहिमेत सुमारे शेकडो कार्यकर्ते दशमीला पंढरपूर मुक्कामी पोहोचले. त्यानंतर त्यांनी नदीपात्रातील चहाचे कप, प्लास्टिकची बॉटल, मोठ्या प्रमाणात वस्त्र, गुटखा पूड्या, तंबाखू पुड्या, अर्धवट जेवणाचे डबे, असे अनेक प्रकारचा सुमारे १० टन निर्माल्य जमा केला.
दरम्यान, स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर व उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी या संपूर्ण मोहिमेचे नियोजन केले. पंढरपूर नगरपरिषदेचे या मोहिमेसाठी विशेष सहकार्य मिळाले. तर शेवटी श्री पांडुरंगाच्या मंदिराची प्रदक्षिणा करून पसायदान घेऊन या मोहिमेची सांगता झाली.
यावेळी स्वराज्य संघाचे सचिव शामकांत निघोट, आंबेगाव अध्यक्ष सुरेश गावडे, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष गावडे, बहिरु निघोट, धाराशिव जिल्हा प्रमुख राम पाटील, किरण बनकर, बलभीम मुळे गुरुजी, वनाजी बांगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.