fire in Katraj : पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत एक दोन नव्हेतर तब्बल सहा झोपड्या जळाल्या आहेत. सुखदबाब म्हणजे या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र झोपडी धारकांचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात
एका गॅस सिलिंडरचा स्फोट : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील केदारेश्वनगर भागात पाण्याच्या टाकीजवळ या झोपड्या होत्या. आग लागताच तिथल्या स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब, टँकरसह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत झोपडीतील एक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. जवानांनी तत्परतेने झोपड्यांमधील सहा सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
२५ जवानांकडून आग आटोक्यात : अर्धा तास पाण्याचा मारा करुन अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आगीत सहा झोपड्या जळाल्या. झोपडीत गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. जवानांनी झोपडीत कोणी अडकले का नाही, याची खात्री केली होती. तत्परतेने रहिवासी बाहेर पडल्याने अनर्थ टळला. मात्र अद्याप आगीमागचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख, सचिन मांडवकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जवानांनी आग आटोक्यात आणली.