Pune NCP Protest | पुणे : महानगर पालिकेचा महत्वकांक्षी मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६००० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काॅग्रेसने आक्रमक पावित्रा घेत झाडांची कत्तल करण्यास विरोध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुण्यात सोमवारी( ता. २७) रोजी सकाळी छत्रपती संभाजी उद्यानाबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख झाडावर चढले.तसेच नदी बचाव, झाडांची कत्तल थांबवा अशी मागणी करणारे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील विरोध…
नदीसुधार प्रकल्पासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याने पर्यावरण प्रेमींना विरोध केला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याला विरोध केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीने या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील आरेसारखा पुण्यातील मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
पुण्यात मुळा आणि मुठा नदीपात्रामध्ये नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली प्रचंड उलथापालथ सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भर टाकण्यात येत आहे. तर नदीपात्रातील ६००० झाडे तोडण्यात येत असल्याचा आरोप देखील केला जात आहेत.
नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पुणे महापालिका प्रशासन सहा हजार झाडांची कत्तल करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. जी झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे ती देशी झाडे असून अनेक पक्षांचा नैसर्गिक अधिवास आहे. असा पावित्रा राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. तसेच शहराचा विकासही व्हायला हवा व पर्यावरणाचे रक्षण ही व्हावे ह्या मागणीकरीता प्रशासनास व भाजपच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाग यावी यासाठी हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसने केले असल्याचे सांगितले आहे.