पुणे: पुणे आणि नांदेड दरम्यान वंदे भारत (Pune-Nanded Vande Bharat Express) एक्सप्रेस धावणार (Pune News) असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, पुणे-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस डिसेंबर 2025 मध्ये सुरू होणार आहे. या गाडीच्या उद्घाटनाची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

या वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरूवातीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. पुणे ते नांदेड हा 550 किमीचा प्रवास सध्या साधारणपणे 10 तासांचा असतो. मात्र, वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा प्रवास फक्त 7 तासांत पूर्ण होईल, त्यामुळे प्रवाशांचा तब्बल तीन तासांचा वेळ वाचणार आहे. ही गाडी प्रवाशांना केवळ वेगवानच नाही तर आरामदायी प्रवासाची सुविधाही देईल.

नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी पुणे-नांदेड मार्गावर वंदे भारत सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देत गाडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

नांदेड शहराला डिसेंबरमध्ये दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. यापूर्वी मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. आता पुणे आणि नांदेड या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही दुसरी वंदे भारत धावणार आहे. या गाडीला पुणे, दौंड, कुर्डुवाडी, धाराशिव, लातूर आणि नांदेड या ठिकाणी थांबे असण्याची शक्यता आहे.
तिकिटांच्या दराबाबत बोलायचे झाले तर एसी चेअर कारसाठी तिकिटांचे दर 1500 ते 1900 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2000 ते 2500 रुपये दरम्यान असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही गाडी आठवड्यातून पाच ते सहा दिवस धावेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल. तसेच, दोन प्रदेशांतील विकास आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होण्यासही मदत मिळेल.







