पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरिल पुणे-मुंबई मार्गिका आज (9 नोव्हेंबर) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कॉरिडोरचे काम करण्यात येणार असल्याने ही वाहतूक थांबविण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणाऱ्या रेल्वे मार्गाच्या कॉरिडोरचे कामासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हलकी आणि जड- अवजड वाहने यांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
असा असेल पर्यायी मार्ग?
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने मुंबई लेन पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावर करंजाडेमार्गे कळंबोली अशी वळविण्यात येतील.
- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडून मुंबईला येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करण्यात येतील.