पुणे : पुणे मेट्रोने गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक नवा विक्रम केला आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि शहरातील गर्दी टाळण्यासाठी पुणे मेट्रोने सलग 41 तास सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पुणे मेट्रोच्या या निर्णयामुळे हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. शनिवार, 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेली मेट्रो सेवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. या काळात सुमारे 5.9 लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला असून, ही पुणे मेट्रोच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. पुणे मेट्रोने सोशल मीडियावर यासंबंधित पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

प्रवाशांची सर्वाधिक गर्दी कोणत्या स्थानकांवर?

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. मंडई स्थानकात सर्वाधिक 65,542 प्रवाशांनी प्रवास केला, तर डेक्कन जिमखाना स्थानकात 64,703 प्रवाशांची नोंद झाली. स्वारगेट स्थानकात 44,917, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानकात 43,363 आणि पुणे महानगरपालिका स्थानकात 39,208 प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. गर्दीमुळे काही प्रवाशांना स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्यास काही अडचणी आल्या, परंतू, या काळात मेट्रो प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी तैनात करून गर्दीचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे हाताळले. विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 24 तासांत 866 मेट्रो फेऱ्या चालवण्यात आल्या.

पुणे मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद
अनंत चतुर्दशी निमित्त दि. ६ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांनी पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतला
धन्यवाद पुणे मेट्रो प्रवासी!
An overwhelming response to Pune Metro
On the occasion of Anant Chaturdashi, on 6th September, devotees availed… pic.twitter.com/NHfeS5m6dQ
— Pune Metro Rail (@metrorailpune) September 7, 2025
गणेश विसर्जनाच्या दिवशी किती प्रवाशांनी प्रवास केला?
विसर्जनाच्या दिवशी, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि सिव्हिल कोर्ट ते वनाझ या मार्गांवर मेट्रो फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाने व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट बुकिंग आणि दैनंदिन पासची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या पासद्वारे 100 रुपयांत प्रवासी दिवसभर अमर्यादित प्रवास करू शकत होते. गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांत दररोज 3 लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला, तर विसर्जनाच्या दिवशी ही संख्या जवळपास 6 लाखांपर्यंत पोहोचली. संपूर्ण गणेशोत्सवात 31,96,446 प्रवाशांनी पुणे मेट्रोने प्रवास केला आहे.
दरम्यान, पुणेकर आता मोठ्या प्रमाणावर मेट्रोचा वापर करत असून, भविष्यात ही संख्या आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.







