पुणे: वारीच्या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या वारकरी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने विशेष तयारी केली होती. मेट्रोच्या मार्ग क्रमांक एक (वनाज-रामवाडी) आणि दोन (पीसीएमसी-स्वारगेट) या दोन्ही मार्गांवर अतिरिक्त १३० फेऱ्या चालवण्यात आल्या. यामुळे वारकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

२० जून २०२५ रोजी पुणे मेट्रोत एकाच दिवशी तब्बल तीन लाख १९ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, यातील मोठा हिस्सा वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांचा होता. वारकऱ्यांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला आणि ही सेवा खूपच सोयीस्कर आणि वेळ वाचवणारी ठरली, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ
सध्या पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दोन्ही मार्गांवर प्रवासी सेवा सुरू आहे. मेट्रो ही शहरातील विश्वासार्ह आणि गतिशील सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. सामान्यतः पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे १.६० लाख असते. मात्र वारीच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवसात ३.१९ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करताना नोंदवले गेले, ही एक विक्रमी कामगिरी ठरली आहे.

उत्पन्नात वाढ आणि प्रवाशांना दिलासा
अतिरिक्त फेऱ्यांमुळे एकीकडे मेट्रोच्या उत्पन्नात मोठी भर पडली, तर दुसरीकडे प्रवाशांना गर्दीच्या वेळात अधिक फेऱ्यांचा लाभ घेता आला. त्यामुळे पुणे मेट्रोच्या या प्रयत्नाचे प्रवासी आणि वारकरी दोघांनीही स्वागत केले आहे.







